रस्ता, कचरा समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कर भरू नका; राजू पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:50 PM2020-12-04T23:50:51+5:302020-12-04T23:51:22+5:30

कचरा दररोज आणि वे‌ळेवर उचलला जात नाही. बेकायदा टपऱ्या, ढाबे उभे राहत आहेत. कोणीही डेब्रिज टाकत आहे, हे काय चालले आहे, असा सवाल पाटील यांनी करताच केडीएमसीचे रस्ते व स्वच्छता विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. 

Don't pay taxes until the road, garbage problems go away; Raju Patil's appeal | रस्ता, कचरा समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कर भरू नका; राजू पाटील यांचे आवाहन

रस्ता, कचरा समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कर भरू नका; राजू पाटील यांचे आवाहन

Next

डोंबिवली :  पूर्वेतील नांदिवली येथील समर्थनगर परिसरात विविध समस्या आहेत. हा भाग वाळीत टाकल्यासारखा आहे का? नागरिकांनी पक्के रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट, मलनि:सारण योजनेची पूर्तता होत नाही, तोपर्यंत केडीएमसीकडे कर भरू नये, असे आवाहन कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केले.

नांदिवलीतील समर्थनगरमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. त्या परिसराची शुक्रवारी पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून वाट काढताना आबालवृद्धांना प्रचंड त्रास होतो. आमचे आरोग्य धोक्यात येते. परंतु, मनपा प्रशासन मात्र काहीच ऐकत नाही, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. त्यावेळी रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे, असा सवाल पाटील यांनी मनपा अभियंत्यांना केला. त्यावर निधी मंजूर आहे, पण निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच एकवेळ रस्ता होईल, पण ड्रेनेजचे काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी हवा असून, त्याची तरतूद आयुक्तच करू शकतात, असे उत्तर अभियंत्यांनी दिले. त्यावर याबाबत आपण लवकरच आयुक्तांना भेटणार असल्याचे पाटील म्हणाले.

कचरा दररोज आणि वे‌ळेवर उचलला जात नाही. बेकायदा टपऱ्या, ढाबे उभे राहत आहेत. कोणीही डेब्रिज टाकत आहे, हे काय चालले आहे, असा सवाल पाटील यांनी करताच केडीएमसीचे रस्ते व स्वच्छता विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. दरम्यान, ‘कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास वर्षभर कचरा उचलणार नाही, अशी धमकी मनपा अधिकारी देतात, मग ढाबेवाल्यांचे कसे सगळे चालते’, असा सवाल यावेळी परिसरातील एका महिलेने केला.

‘व्यवसाय करणे झाले कठीण’
आम्ही रीतसर परवानगी घेऊन बांधकामे करत असलो तरी रस्ते नाहीत, कचऱ्याची समस्या, पावसाळ्यात साचणारे पाणी, यामुळे घरे खरेदीसाठी गिऱ्हाईक येणार तरी कसे? त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे, अशी व्यथा बांधकाम व्यावसायिकांनी यावेळी मांडली.

Web Title: Don't pay taxes until the road, garbage problems go away; Raju Patil's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.