फोटो आयडी शिवाय मतदानाचा हक्क देऊ नये; माजी नगरसेवकाची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:15 PM2021-07-17T18:15:20+5:302021-07-17T18:16:21+5:30
फोटो आयडी वोटर कार्ड असल्यावर जो मतदार ते कार्ड घेऊन येतो. तोच मतदार मतदान करीत आहे. हे त्यावरून सिद्ध होते. त्यामुळे बोगस मतदानाला वाव राहत नाही.
कल्याण- कोरोनामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दीड वर्षे लांबणीवर पडली. मात्र तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन कोरोना प्रादूर्भाव कमी होताच महापालिकेची निवडणूक जाहिर होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरुनच मतदानाचा हक्क फोटो आयडी असलेले वोटरकार्ड असल्याशिवाय देण्यात येऊ नये, याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांकडे ही मागणी केली आहे.
माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केलेल्या मागणीनुसार डोंबिवली विधानसभा मतदार संघात ३ लाख ७५ हजार १५६ मतदार आहे. त्यापैकी १ लाख ७० हजार ९२ मतदारांचे छायाचित्र यादीत नाही. छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या इतकी मोठी आहे. त्यापैकी मयत मतदारांची संख्या ९९४ आहे. याशिवाय कोरोना काळात काही मतदार स्थलांकरीत झाले. त्यांची संख्या १४ हजार ९८३ आहे.
मतदारांना त्यांच्या फोटोसह त्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असा कार्यक्रम निवडणूकीपूर्वी राज्य निवडणूक आयोगामार्फत राबविला जातो. अनेक मतदार त्यांचा फोटो आयडी देत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ज्यांचा फोटो आयडी नाही. त्यांच्याकडून मतदानावेळी बोगस मतदान केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकशाहीच्या निकोप निवडणूक प्रक्रियेला त्यामुळे हरताळ फासला जातो.
फोटो आयडी वोटर कार्ड असल्यावर जो मतदार ते कार्ड घेऊन येतो. तोच मतदार मतदान करीत आहे. हे त्यावरून सिद्ध होते. त्यामुळे बोगस मतदानाला वाव राहत नाही. बोगस मतदान रोखण्यासाठी फोटो आयडी असलेले वोटर कार्ड अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय मतदानाचा हक्क बजाविता येऊ नये, याकडे निवडणूक आयुक्तांसह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आाहे. याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.