डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान

By मुरलीधर भवार | Published: February 17, 2024 04:45 PM2024-02-17T16:45:09+5:302024-02-17T16:46:05+5:30

लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांना जाहीर झाला होता.

Dr. Shrikant Shinde awarded this year's Parliament Ratna Award | डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान

डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान

कल्याण- महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. लोकसभेतील कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार  शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर हा संसद रत्न पुरस्कार मिळणे अत्यंत आनंदाची बाब असून मिळालेला पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करत असल्याच्या भावना यावेळी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

खासदार  शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात खासदार शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खासगी विधेयके त्यांनी मांडली आहेत. १९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार, २०१०पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक आदी या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो.

लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांना जाहीर झाला होता. आज, शनिवारी, मान्यवरांच्या मुख्य उपस्थितीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी खासदार शिंदे यांना संसद रत्न तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकसभेतील कामकाजात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नियमितपणे सहभागी होत असतात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर खासदार शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार  शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१४च्या लोकसभेत निवडून आलेले खासदार शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे खासदार शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
पुरस्कार स्विकारल्यानंतर खासदार शिंदे यांनी सांगितले की,

लोकसभेत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याबाबत आनंद आहे. या गौरवामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मला २०१४ आणि २०१९ साली मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यामुळेच आज मी त्यांचे प्रश्न संसदेत सादर करू शकलो. यामुळे मला मिळालेला हा आजचा पुरस्कार मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांना समर्पित करतो. तसेच सर्व नागरिकांचे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.

Web Title: Dr. Shrikant Shinde awarded this year's Parliament Ratna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.