"खोके यायचे बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू"; डॉ. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By मुरलीधर भवार | Published: June 17, 2023 05:44 PM2023-06-17T17:44:38+5:302023-06-17T17:55:43+5:30
गेल्या ११ महिन्यात विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे खासदार शिंदे यांनी वेळी सांगितले.
कल्याण-खोक्यांचा जप इतका केला जात आहे. कारण अगोदर खोके याचचे. खोके येणे बंद झाल्याने हा जप केला जात असल्याची टीका कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्वव ठाकरे यांच्यावर केली आहे. कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज अत्रे रंग मंदिरात करण्यात आले होेते. या प्रसंगी खासदार शिंदे यांनी उपरोक्त टीका केली. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, प्रवक्ते नरेश म्हस्के, शहर प्रमुख रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, अडीच वर्षे विकास कामे ठप्प होती. गेल्या ११ महिन्यात विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे खासदार शिंदे यांनी वेळी सांगितले. लोकांना काय हवे आहे तो विकास देण्याऐवजी ते नाईट लाईफ देण्यावर ठाम होेते अशी टीका खासदार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर यावेळी केली. कोरोना काळात युवराजांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा कोराेना किट घेऊन आले.
कोराेना टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच युवराज आम्हाला भेटले हा किस्सा सांगून युवराजांची भेट होणे किती अवघड होते यावर खासदार शिंदे यांनी कटाक्ष केला. शिवसेना भाजप युतीत मनोमिलन झाले का असा सवाल खासदार शिंदे यांना विचारता त्यांनी सांगितले की, ही युती एका वेगळ्या विचारांनी झालेली आहे. युतीत छोट्या कारणामुळे वितुष्ट येणार नाही. विरोधकांना काही काम उरलेले नाही. त्यांचा दिवस लावा लाव्या करण्यात जातो.