रुग्णालयाच्या दारातच महिला प्रसूती प्रकरणी डॉ. तृणाली महातेकर निलंबित
By मुरलीधर भवार | Published: November 27, 2023 05:41 PM2023-11-27T17:41:43+5:302023-11-27T17:42:34+5:30
डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुरलीधर भवार-कल्याण: तीन महिन्यापूर्वी एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता तिला दाखळ करुन घेतले नाही. तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
९ सप्टेंबर सायंकाळी ८ वाजता कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील स्कायवा’कवर एका गरोदर महिलेस प्रसूतीच्या वेतना सुरु झाल्या. त्याठिकाणी तिची अवघड अवस्था पाहून पादचारी आणि नागरीकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. तिला रुग्णालयात पोहचविण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तिला काही हमालांच्या मदतीने हातगाडीवर टाकून रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले गेले. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या स्टाफने महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन घेण्यास नकार दिला. पुरेसा स्टाफ नसल्याचे कारण दिले. वसंत व्ह’ली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. वसंत व्ह’लीला जाण्या इतपत वेळ नाही. तिची अडलेली अवस्था पाहून पोलिसांनी या महिलेला प्रसूती करीता दाखल करुन घ्या, अशी विनंती कार्यरत असलेल्या स्टाफकडे केली होती. कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि स्टाफने पोलिसांची विनंती ही मानली नाही.
महिलेस दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारातच झाली. या प्रकरणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत आंदोलन केले. या घटनेस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची चौकशी समिती नेमली. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या चाैकशी समितीने चौकशी करुन गरोदर महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन घेण्यास डॉ. महातेकर या जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी डॉ. महातेकर यांना निलंबित केले आहे.