उकाड्याने हैराण डोंबिवलीकरांना रिमझिम पावसाने दिलासा, वातावरणात गारवा
By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 01:42 PM2023-08-21T13:42:36+5:302023-08-21T13:42:54+5:30
रस्त्यांवर खड्डे, त्यातील खडी यामुळे अपघाताची भीती आणि त्यातून उडणारी धूळ त्यात उकाडा, घामेघुम वातावरण यांमुळे नागरिक हैराण झाले होते.
डोंबिवली: भर पावसाळ्यात पंधरा दिवसांपासून दमट हवामानात वाढ झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या डोंबिवलीकर नागरिकांना सोमवारी रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला.
रस्त्यांवर खड्डे, त्यातील खडी यामुळे अपघाताची भीती आणि त्यातून उडणारी धूळ त्यात उकाडा, घामेघुम वातावरण यांमुळे नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारपासून आकाश ढगाळलेले होते, पण पावसाचा पत्ता नव्हता, त्यामुळे उष्णता अधिक वाढली होती. रविवारी हलक्या सरी पडल्या पण त्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त वाढले, सोमवारी सकाळी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली, आणि चाकरमान्यांची साडेआठ वाजता एकच त्रेधातिरपीट उडाली. त्यानंतर दुपारपर्यंत रिमझिम।पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा आला होता, आकाश पूर्णतः ढगाळलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवार असल्याने मुख्य बाजारपेठ बंद असून पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाजीबाजारात गर्दी झाली होती. सकाळी शाळेत जाताना आणि दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांनी पावसाचा आनन्द लुटला. दुकाने बंद असल्याने बाजारात गर्दी झालेली नव्हती, वाहतूक देखील सुरळीत सुरू होती. हवेतील सुखद गारवा असाच वाढू दे अशी अपेक्षा उष्म्याने त्रस्त नागरिकांनीकेली.