उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर ड्रोनची नजर, केडीएमसीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:18 AM2021-03-30T01:18:59+5:302021-03-30T01:19:47+5:30

KDMC News : कचरासमस्या सोडवण्यासाठी केडीएमसीतर्फे शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. कचरा वर्गीकरण करा, तसेच रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नका, असे आवाहन मनपा करत आहे

Drone's eye on open litter, KDMC's decision | उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर ड्रोनची नजर, केडीएमसीचा निर्णय

उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर ड्रोनची नजर, केडीएमसीचा निर्णय

Next

कल्याण : कचरासमस्या सोडवण्यासाठी केडीएमसीतर्फे शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. कचरा वर्गीकरण करा, तसेच रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नका, असे आवाहन मनपा करत आहे; मात्र तरीही अनेक लोक उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेतून बुधवारपासून त्याची सुरुवात झाली आहे.

मनपाने शून्य कचरा मोहीम राबवताना शहरांतील कचरा कुंड्या हटविल्या आहेत. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत द्यावा, असे आवाहन केले आहे. ओला कचरा बायोगॅस प्रकल्पाकडे, तर सुका कचरा प्रक्रिया केंद्राकडे कसा जाईल, यावर महापालिकेने भर दिला आहे. तसेच कचरा कुठेही टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छता मार्शलही नेमले आहेत; मात्र नागरिक आणि स्वच्छता मार्शल यांच्यात कचरा टाकण्याच्या कारवाईवरून वादंग होतो. त्यावर नामी युक्ती शोधताना मनपाने स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रोन कॅमेरा खरेदी केला आहे. या कॅमेऱ्याद्वारे आता कुठेही कचरा फेकणाऱ्यांना पकडून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

दरम्यान, कचरा टाकणाऱ्यांविरोधात यापूर्वी मनपाने कारवाई करून त्यांना दंड आकारून थेट कोर्टापुढे हजर केले आहे. त्याच कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेत सुरू केलेली ड्रोन कॅमेऱ्याची कारवाई आता पुढे अन्य भागांतही सुरू केली जाणार आहे.
 

Web Title: Drone's eye on open litter, KDMC's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.