जनाब, उर्दू किताबों से मिलीए, कुतुब बिनी का लुत्फ उठाइये, रील्स, वेबसाइटमुळे तरुणाईची उर्दू वाचनाकडे पाठ
By मुरलीधर भवार | Published: January 4, 2024 02:21 PM2024-01-04T14:21:59+5:302024-01-04T14:22:22+5:30
विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी वेगवेगळ्या रकमांची पुस्तके खरेदी केली तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
कल्याण : इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल आणि पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाइलमध्ये रील्स, वेबसाइट पाहण्याकडे ओढा यामुळे मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित २६व्या उर्दू बुक फेअरला वाचकांचा प्रतिसाद मिळेल किंवा कसे, अशी शंका आयोजकांना वाटत असल्याने ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमध्ये उर्दू शाळा आहेत तेथे जाऊन बुक फेअरला येण्याबाबत जनजागृती करीत आहेत. विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी वेगवेगळ्या रकमांची पुस्तके खरेदी केली तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज ही केंद्र सरकारची संस्था आहे. या संस्थेच्या पुढाकाराने देशभरात नॅशनल उर्दू बुक फेअरचे आयोजन केले जाते. २६वी नॅशनल उर्दू बुक फेअर मुंबईतील बीकेसी ग्राउंडवर आयोजित केली आहे. त्याचा शुभारंभ ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ही बुक फेअर १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या बुक फेअरमध्ये देशभरातील १८० उर्दू पुस्तक प्रकाशक सहभागी होणार आहेत. विविध विषयांवरील साडेतीन लाख उर्दू पुस्तके उर्दू भाषिकांना चाळता, पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. याठिकाणी पुस्तकांच्या माध्यमातून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाची प्रतिकृती साकारली जाणार आहे. राज्यभरात उर्दू माध्यमाच्या तीन हजार ६०० शाळा आहेत. त्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
उर्दू पुस्तक विक्रेत्यांसमोर समस्या
कल्याणमधील नॅशनल उर्दू स्कूल ही मोठी शाळा आहे. या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या बुक फेअरचे समन्वयक इम्तीयाज खलील यांच्यासह पासबान प्रकाशनचे संपादक शब्बीर शाकीर, प्रा. माजिद अन्सारी, मुख्याध्यापक अब्दुल्ला खान, सय्यद जाहिद आणि स्तंभलेखक एजाज अब्दुल गनी यांनी उर्दू नॅशनल स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अभ्यासातील क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त विविध विषयावरील पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत, याबाबत त्यांनी प्रबोधन केले. उर्दू शाळेत शिकणारी बहुतांश मुले-मुली सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अवांतर वाचत नसल्याने मराठी भाषेतील ग्रंथव्यवहारासमोर जशी समस्या आहे तशीच ती उर्दू पुस्तक विक्रेत्यांसमोरही आहे.
पुस्तके खरेदी केल्यास प्रमाणपत्र मिळणार
या पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी ५०० रुपयांची, शिक्षकांनी पाच हजार रुपयांची आणि संस्थांनी २५ हजार रुपयांची पुस्तके खरेदी केल्यास त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
सहा ते १४ दरम्यान उर्दू साहित्यिक मेजवानी
ऑनलाइन शिक्षणातील समस्या, स्पर्धा परीक्षा, उर्दू भाषेतील पत्रकारिता, उर्दू भाषेची चळवळ, उर्दू कॅलिग्राफी आदी विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहेत. भाषेतील तज्ज्ञ त्याठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, समारोपाच्या प्रसंगी आयोजित मुशायऱ्याला ख्यातनाम शायर गुलजारस गझल गायक तलत अजिज व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.