टँकर चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी
By पंकज पाटील | Published: January 2, 2024 07:02 PM2024-01-02T19:02:37+5:302024-01-02T19:03:05+5:30
पेट्रोल पंप वर देखील इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे.
पंकज पाटील, अंबरनाथ: केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक टँकर आहे तिथेच उभे करण्यात आल्याने पेट्रोल पंप वर देखील इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे. या संपामुळे पेट्रोल भेटणे कठीण होईल म्हणून सोमवारी रात्रीपासूनच वाहन चालकानी पेट्रोल पंप बाहेर गर्दी केली होती. आज दिवसभर देखील पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
अंबरनाथ शहरात सोमवारी रात्री रिलायन्स पेट्रोल पंप बाहेर तब्बल 400 ते 500 वाहनांची गर्दी झाली होती. टँकर चालकांचा संपामुळे पेट्रोल पंप वर इंधनपुरवठा बंद होण्याची भीती असल्यामुळेच अनेक वाहनचालकाने आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी रांग लावली होती. पेट्रोल पंपावर झालेली गर्दी पाहून पेट्रोल पंप चालकांनी देखील प्रत्येक वाहनात केवळ दोनशे रुपयांचा पेट्रोल टाकले. मंगळवारी सकाळी देखील अंबरनाथच्या विमको नाका आणि फॉरेस्ट नाका परिसरातील पेट्रोल पंपवर लांबच लांब लांब रांग लागली होती. ही सर्व वाहने आपल्या गाडीत इंधन भरून घेण्यासाठी उभे होते. काही पेट्रोल पंप चालकांचे टँकर न आल्याने त्या पंपावर पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला होता.