तरुणांच्या धाडसामुळे चोरीचा डाव फसला, तिघांपैकी दोघे गजाआड
By प्रशांत माने | Published: August 25, 2023 04:21 PM2023-08-25T16:21:36+5:302023-08-25T16:31:54+5:30
चंदन बालकिसन सरोज (वय २३) आणि लक्ष्मण सुरेश रोकडे (२२, दोघेही रा. ठाणे) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
डोंबिवली : येथील पूर्वेकडील छेडा रोडवरील देढिया निवास बिल्डींगमधील न्यू डोंबिवली केमिस्ट आणि जनरल स्टोअर या दुकानाचे शटर वाकवून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा चोरट्यांचा डाव दोघा तरूणांनी दाखविलेल्या धाडसामुळे फसला. घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात संबंधित तरूणांना यश आले. ही घटना गुरूवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. चोरट्यांना रामनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
चंदन बालकिसन सरोज (वय २३) आणि लक्ष्मण सुरेश रोकडे (२२, दोघेही रा. ठाणे) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. फरार झालेल्या त्यांच्या सहकाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. चंदन हा रिक्षाचालक आहे. चोरी करण्यासाठी तिघे त्याच्या रिक्षातून आले होते. चंदन हा न्यू डोंबिवली केमिस्ट दुकानासमोर रिक्षात बसून होता, तर अन्य दोघांनी केमिस्टमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने त्याचे शटर उचकटले होते. त्याचवेळी छेडा रोड परिसरातील त्रिमुर्ती वसाहतीत राहणारे विक्की पवार आणि निलेश पटेल हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी रूमाल तोंडावर बांधलेले दोघेजण रिक्षाकडे येताना त्यांना दिसले. दुचाकीवरील दोघांना बघताच चोरटे पळायला लागले.
संशय येताच विक्कीने रिक्षात बसलेल्या चंदनला तिथेच पकडले, तर निलेशने पलायन करणाऱ्या अन्य दोघांचा पाठलाग केला. यात लक्ष्मणला पकडण्यात निलेशला यश आले. अन्य एकजण मात्र पळून गेला. निलेशने रामनगर पोलिसांना याची माहिती कळविली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत लक्ष्मण आणि चंदन या दोघांना ताब्यात घेतले. शटर उचकटले, पण चोरीला झाली नाही
केमिस्ट दुकानाचे मालक हिंमत चौधरी यांनीही माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. चोरट्यांनी केमिस्टचे शटर उचकटले, पण त्यातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही. विक्की आणि निलेश या दोघा तरूणांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरीचा डाव उधळला गेला. दोघांचेही कौतुक होत आहे.