वीज तारांवर कावळा बसल्याने (क्रो फॉल) शॉर्टसर्किट होऊन वीज खंडीत
By अनिकेत घमंडी | Published: July 10, 2024 02:32 PM2024-07-10T14:32:20+5:302024-07-10T14:32:34+5:30
वारंवार वीज खंडीत होण्याने ग्राहक हैराण.
डोंबिवली: महावितरणने भरमसाठ वीजबिले वाढवल्याने ग्राहक हैराण असतानाच डोंबिवली पूर्वेला बाजीप्रभू, गणेश मंदिर, रामनगर फीडरवर सातत्याने वीज खंडित होण्याच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पेंडसेनगर भागात दोन कावळे वीज पुरवठ्याच्या संपर्कात आल्याने (क्रोफॉल) सकाळी ११:४५ वाजता वीज खंडित झाली. त्यामुळे पेंडसेनगर, बाजीप्रभू चौक, फडके पथ, भगतसिंग पथ, फते अली रोड यासह गणेश मंदिर भागात वीज खंडित झाली होती. अचानक वीज खंडित झाल्याने ग्राहक हैराण झाले होते, त्यानंतर महावितरणने झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. सोमवारीही महावितरणने ग्राहकांना सूचित करून वीज पुरवठा बंद।केला होता, सोमवारी बाजारपेठ बंद असली तरी अन्य ग्राहकांचे हाल झाले. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती, अनेकांनी घरी येणे पसंत केले, मात्र त्यात वीज खंडीत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागला. पाऊस पडूनही वातावरणात उकाडा कायम असल्याने वीज नसल्यामुळे समस्येत वाढ होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. पावसाच्या शिडकाव्याने देखील वीज खंडित होत असल्याची नाराजी व्यक्त झाली. अखेर सव्वा तासाने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
गणेश मंदिर फिडर वरील पेंडसेनगर शाखेचा ट्रान्सफॉर्मर अर्थ फॉल्ट असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. : महावितरण
या सर्व परिसरात साधारण १२ च्या सुमारास पाण्याचे झोनिंग (वेळ) असल्याने त्या कालावधीत वीज खंडित झाल्यास अनेक सोसायटयांना पाण्याची समस्या निर्माण होते, मनपाचे पाणी येते, परंतु वीजपुरवठा नसल्याने समस्येत वाढ होते, आणि त्यामुळे देखील कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते. एकीकडे वीज खंडित, पाणी नाही अशा दुहेरी कात्रीत नागरिक सापडत असल्याने अनेकांनी महावितरणच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त।केला.