वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती
By अनिकेत घमंडी | Published: January 17, 2024 04:34 PM2024-01-17T16:34:41+5:302024-01-17T16:35:19+5:30
पेंढारकर कॉलेज/एमआयडीसी कार्यालय ते संत सावळाराम महाराज क्रीडा संकुला पर्यंत मोठी भव्यदिव्य अशी रोषणाई करण्यात आली असून माहितीसाठी मोठे फलक लावण्यात आले आहेत.
डोंबिवली: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अनेक कार्यक्रम सद्या सुरू आहेत. हिंदू धर्माच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र हे सोहळे/उत्सव करतांना पर्यावरणाचा विचार करून तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे होती, अशी मागणी पर्यावरण प्रेमी राजू नलावडे यांनी केली. विशेषतः एमआयडीसी भागात अपघातांची शक्यता आहे.
पेंढारकर कॉलेज/एमआयडीसी कार्यालय ते संत सावळाराम महाराज क्रीडा संकुला पर्यंत मोठी भव्यदिव्य अशी रोषणाई करण्यात आली असून माहितीसाठी मोठे फलक लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी ही वीज दिव्यांची रोषणाई काही ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्यावर करण्यात आली आहे. एमआयडीसी कार्यालय, रोटरी पार्क उद्यान आणि क्रीडा संकुल लगत हे विशेष दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच येथून जवळच आर आर हॉस्पिटल समोर असेच एका हॉटेल व्यावसायिकांने नाताळ/नवीन वर्षाच्या निमित्ताने झाडांवर अशीच वीज दिव्यांची रोषणाई केली होती. शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे मोठी आग लागून काही झाडे जलाली होती. त्यामुळे येथेही तशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. शिवाय या वीज दिव्यांच्या माळा रस्त्यांचा मधून उंचावरून लोंबकळत जात आहेत. त्या जरी मोठ्या वाहनांना लागत नसल्या तरी कधीही पडून किंवा धक्का लागून खाली येण्याची शक्यता असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
श्रीराम कृपेच्या आशीर्वादाने अशी घटना होणार नाही याची आशा आपण बाळगुया, परंतु आपल्याकडून ही खबरदारी घेतली गेली पाहिजे. एमआयडीसी मधील ही वृक्ष संपदा वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असे समजून कोणताही वाद न घालता यातून योग्य मार्ग शोधून सुरक्षित ठिकाणी या वीज दिव्यांच्या माळा फिरून घ्याव्यात. म्हणून या संबंधित असलेल्या सर्व आयोजकांना कळकळीची विनंती आहे की, आपण कुठलाही धार्मिक/राजकीय हेतूने न बघता कृपया कार्यवाही करावी असेही ते म्हणाले.