पूर येण्याआधीच मिळणार पूर्वसूचना; केडीएमसीची स्मार्ट यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 06:09 PM2022-06-07T18:09:07+5:302022-06-07T18:09:28+5:30
फ्लड सेन्सर्स 10 ठिकाणी बसवले
कल्याण - पावसाळा अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने सुद्धा पावसाळयात उद्भवणा-या आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. दरवर्षी शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं जातं. मात्र पूर येण्याअगोदर आता पूर्वसूचना कशी मिळेल यासाठी पालिकेने स्मार्ट आयडिया लढवली आहे. केडीएमसी प्रशासनाने स्मार्ट उपाय योजत कल्याण आणि टिटवाळा परिसरात 10 ठिकाणी फ्लड सेन्सर्स बसवले आहेत. या फ्लड सेन्सर्सच्या माध्यमातून पूर येण्याच्या सुमारे अर्धा ते पाऊण तास आधीच प्रशासनाला अलर्ट मिळणार असल्याने नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
या 10 ठिकाणी बसवण्यात आलेले फ्लड स्नेसर्स लेझर किरणांच्या माध्यमातून खाडी आणि नदीतील पाण्याची पातळी सतत तपासत राहणार. पावसाळ्यात ही पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसा स्मार्ट सिटी कंट्रोल आणि कमांड सेंटरला त्याचा अलर्ट प्राप्त होईल. ज्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याचे केडीएमसी प्रशासनाला लगेचच लक्षात येईल आणि त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळेल. त्यासोबतच कल्याणमध्ये बसवण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या डिस्प्ले बोर्डवरही वाढत्या पाणी पातळीबाबत माहिती दाखवली जाईल. तसेच शहरात 28 ठिकाणी बसवण्यात आलेल्या उद्घोषक यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांनाही त्याची सूचना दिली जाणार आहे असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
याठिकाणी लावण्यात आलेत फ्लड सेन्सर्स...
जी के पंपिंग स्टेशन पत्रीपुल, कल्याण पश्चिम
भवानी चौक गणेश घाट, कल्याण पश्चिम
टिटवाळा पश्चिम, स्मशान घाट
चिंचपाडा, साकेत कॉलेज, कल्याण पूर्व
मोहने जलशुद्धीकरण केंद्र
मोहिली जलशुद्धीकरण केंद्र
रेती बंदर, कल्याण खाडी
आधारवाडी एसटीपी, सोनवणे कॉलेज
टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र