बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीकडून केडीएमसीकडे कागदपत्रांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: October 18, 2022 07:44 PM2022-10-18T19:44:55+5:302022-10-18T19:45:07+5:30
ईडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे.
कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन परवानगी मिळविल्याचे भासविले. त्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणी डोंबिवलीत ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. दरम्यान ईडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे.
बिल्डरांकडून फसवणूक करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणली. या प्रकरणात उच्च न्यायालयात पाटील यांनी दाखल केलेली एक याचिकाही न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान महापालिकेने डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेसह रेरा प्राधिकरणाची फसवणूक करण्यात आली असल्याने पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात ठाणो गुन्हे शाखेच्या अधिकारी वर्गाची एसआयटी नेमली आली. या प्रकरणात नागरीकांसह सरकार आणि सरकारी प्राधिकरणाची फसवणूक झाली आहे.
त्यामुळे हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. मोठय़ा आर्थिक घोटाळ्य़ाची माहिती ईडीला दिली जाते. एसआयटीने ही माहिती ईडीला दिली होती. त्या आधारेच ईडीने महापालिका आयुक्तांकडे या फसवणूक प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने ईडीने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते. या प्रकरणाचा तपास ईडी देखील करु शकते.
दरम्यान ईडीची या प्रकरणात एंट्री होणार असल्यास त्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. बिल्डरसह महापालिका आणि रेराच्या अधिका:यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.