"घोटाळेबाज प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त", किरीट सोमय्या यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 03:46 PM2021-01-10T15:46:44+5:302021-01-10T15:50:48+5:30
Pratap Saranaik News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
कल्याण - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटीची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही ईडी जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
टिटवाळा गुरुवली येथील जमीनीच्या ठिकाणी भाजप नेते सोमय्या यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, शक्तीवान भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. एनईसीएलच्या 100 कोटीच्या घोटाळ्याच्या रक्कमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे 78 एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन ईटीने जप्त करण्याची नोटिस 2014 सालीच काढली होती. आत्ता ही जमीन जप्त करण्याची कारवाई ईटीने केली आहे. त्याची नोटीसच सोमय्या यांनी माध्यमांना सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेल्या घोटाळेबाज सरनाईकच्या विरोधात ठाकरे सरकार काय कारवाई करणार आहे असा खडा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आाहे. 13 हजार गुतंवणूकदारांचे 560 कोटी रुपये सरनाईक यांनी गायब केले आहे. घोटाळ्य़ांसी सरनाईक यांचा थेट संबंध आहे. 100 कोटी रुपये सरनाईक यांनी परत न केल्यास ईडी सरनाईकच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्याची कारवाई करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
आमच्या पेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची-सोमय्या
सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणा:या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे असे सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांना वाहतूक कोंडीचा फटका
कल्याण-टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली.
ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती ही थांबली आहे. महापालिका निवडणूका जवळ आलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत जतना ठाकरे सरकारला धडा शिकविणार आहे अशी टिका सोमय्या यांनी केली आहे.