शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:58 PM2024-09-15T22:58:33+5:302024-09-15T22:59:28+5:30
Maharashtra Politics in Kalyan Dombivli: शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता
मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याणडोंबिवली: राज्यभरात आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले असून सर्व राजकीय पक्षांमध्ये आतापासूनच जागा वाटपावरून खलबतं सुरू झाली आहेत. कल्याणडोंबिवली विभागाचे राजकारण नेहमीच रंगतदार राहिले आहे. कल्याण डोंबिवली शहरात आमदारकीच्या निवडणुका लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तशातच रविवारी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाने भावी आमदाराचा केक कापल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केकवर 'भावी आमदार'
शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचा रविवारी वाढदिवस होता. यावेळी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित होते. मोरे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकवर 'भावी आमदार' असा उल्लेख होता. हा केक मोरे यांनी कापल्यावर शाखेमध्ये मोठा जल्लोष झाला.
कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यात इच्छुक
राजेश मोरे हे कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे याआधीही मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना मान्य केलं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ डोंबिवलीतच नाही तर कल्याण शहरात, कल्याण ग्रामीण परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. त्यातच कार्यकर्त्यांनी मोरे यांच्यासाठी भावी आमदार असं नमूद केलेला केक सेलिब्रेशनसाठी आणल्याने आता येणाऱ्या काळात मोरे यांची ही इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनावर घेतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.