धावत्या लोकलच्या लगेज बोगीत वयोवृद्धाची हत्या; कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना
By मुरलीधर भवार | Published: March 2, 2023 09:25 PM2023-03-02T21:25:13+5:302023-03-02T21:25:43+5:30
कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतले एका संशयिताला ताब्यात
कल्याण-कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या लोकल गाडीतील लगेच बोगीत एका वयोवृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या वयोवृद्धाचे नाव बबन हांडे देशमुख (६५) असे आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे धावत्या लोकल गाडीतील प्रवाशांच्या जिवित सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बबन हांडे देशमुख हे सेवा निवृत्त होते. ते आंबिवली येथे राहत होते. त्यांनी आज आंबिवली स्थानकातून लोकल गाडी पकडून कल्याण स्टेशन गाठले. ते काही कामानिमित्त कल्याणला आले होते. त्यांचे काम आटोपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास टिटवाळ्य़ाच्या दिशेने जाणारी गाडी पकडली. ते गाडीच्या लगेज बोगीत चढले होते. त्याठिकाणी गाडीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद झाला असावा. या त्याच वादातून काही जणांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत बबन हांडे देशमुख यांचा मृत्यू झाला. ही घटना कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. तोर्पयत गाडी टिटवाळा रेल्वे स्थानकात पोहचली होती.
गाडीच्या लगेच बोगीत बबन हांडे देशमुख हे मृतावस्थेत पाहावयास मिळाले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. हे पाहून अन्य प्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बबन हांडे देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. बबन हांडे देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी एका संशयिताला कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम