स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या : डॉ. श्रीकांत शिंदे
By अनिकेत घमंडी | Published: May 7, 2024 12:17 PM2024-05-07T12:17:43+5:302024-05-07T12:18:38+5:30
डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा येथे महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन
डोंबिवली : स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना नव्हे, तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या, असे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले. डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कळवा येथे महायुतीच्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची, देशाचे भवितव्य आणि दिशा ठरवणारी निवडणूक असल्याचे शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षात देशाने मोठी प्रगती केली असून प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेला आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठबळाने कल्याण लोकसभेतही मागील १० वर्षात विक्रमी विकासकामे झाली असून कल्याण शिळ रस्त्याचे सहा पदरीकरण आणि काँक्रीटीकरण, शिळफाटा येथे उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन येथे उड्डाणपूल, डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पत्री पूल, काटई ऐरोली फ्री वे, काटई रांजणोली एलिवेटेड मार्ग, कॅशलेस हॉस्पिटल, लहान मुलांसाठी एनआयसीयू, मेट्रो या काही प्रमुख कामांसह इतर अनेक प्रकल्प कल्याण लोकसभेत पूर्ण झाले असून काही प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत, तसेच लवकरच कल्याण डोंबिवलीत मेट्रोही येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
यंदा शिवसेना आणि भाजपासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचीही शक्ती एकत्र आली असून त्यामुळे महायुतीचे बळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे ते म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.