महिनाभरात २७ हजार ४०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; सुट्टीच्या दिवशी भरणा केंद्र सुरू
By अनिकेत घमंडी | Published: October 27, 2023 05:40 PM2023-10-27T17:40:06+5:302023-10-27T17:40:32+5:30
चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील ४ लाख ८२ हजार वीज ग्राहकांकडे ९८ कोटी रुपयांची चालु थकबाकी आहे. यातील २७ हजार ४०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा ऑक्टोबर महिन्यात खंडित करण्यात आला. सणासुदीच्या दिवसातील संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलाचा भरणा करण्याचे तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (२८ ऑक्टोबर) आणि रविवारी सुरू ठेवण्यात येणाऱ्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८८ हजार ७८० ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. आक्टोबरमध्ये आतापर्यंत या मंडलांतर्गत ६ हजार १९० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत १ लाख ४४ हजार २९३ ग्राहकांकडे २८ कोटी १८ लाख रुपयांचे वीजबिल थकित असून ७ हजार ९४६ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख ६८ हजार २९० ग्राहकांकडे ३६ कोटी ४३ लाख रुपये थकीत असून ९ हजार ६२३ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर पालघर मंडलातील ८० हजार ९५१ ग्राहकांकडे १५ कोटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत असून ३ हजार ६६२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली असून याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.