एमआयडीसीत केबल नादुरुस्त झाल्यामुळे बारा तास वीज पुरवठा बंद
By अनिकेत घमंडी | Published: April 20, 2024 08:14 PM2024-04-20T20:14:46+5:302024-04-20T20:15:13+5:30
वारंवार वीज जात असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे.
डोंबिवली : येथील एमआयडीसी निवासी भागात एका हॉस्पिटल रस्त्यावरील काही इमारती आणि बंगल्यात शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून वीज पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून महावितरण कर्मचारी नादुरुस्त केबल दुरुस्त करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असून, बारा तासांनी सहा वाजता वीजपुरवठा चालू करण्यात आला. भयंकर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यात असे वारंवार वीज जात असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे.
शुक्रवारी निवासी भागात रात्री साडे दहा नंतर मध्यरात्री पर्यंत वीज पुरवठा जात येत होता. त्यात आज एमआयडीसी कडून होणारा पाणी पुरवठा काल शुक्रवार पासून जो एक दिवसासाठी बंद होता तो पाणी पुरवठा दुरुस्ती अभावी शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू झाल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले. केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण निवासी भागात वाढत असून काही दिवसापूर्वी मिलापनगर मध्ये तेरा तास वीज पुरवठा याच कारणासाठी बंद होता. काँक्रिट रस्ता, सांडपाणी वाहिन्या, गटारे इत्यादी कामामुळे महावितरणच्या भूमिगत केबलला धक्का लागल्याने केबल नादुरुस्त होत असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आगामी पावसाळ्यात केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे नलावडे म्हणाले.