चिखलोलीत टर्फ चालकाकडून वीजचोरी; पोलिसांत गुन्हा दाखल
By अनिकेत घमंडी | Published: July 14, 2023 05:40 PM2023-07-14T17:40:50+5:302023-07-14T17:44:10+5:30
टर्फचालक संदीप श्रीराम धोंडे आणि जागामालक केवल विकमणी अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
डोंबिवली : चिखलोली येथील एका टर्फ चालकाने गेल्या सहा महिन्यात २४ हजार ७५० रुपयांची १ हाजर ३ युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कुळगाव शहर शाखा दोनचे सहायक अभियंता तन्वीर हिंदुराव यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात टर्फ चालक व जागामालक यांच्याविरुद्ध वीज कायदा २००३ नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती महावितरणने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.
टर्फचालक संदीप श्रीराम धोंडे आणि जागामालक केवल विकमणी अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चिखलोली पाड्यातील एनएमआरएल कंपनीसमोरच्या तबेल्यामागे असलेल्या पत्र्याच्या बंदिस्त शेडच्या वीज पुरवठ्याची सहायक अभियंता हिंदुराव यांच्या पथकाने तपासणी केली. यात मीटरकडे येणाऱ्या इनकंमिग केबलला पत्र्याच्या शेडवर टॅपिंग केल्याचे आढळले. अधिक तपासणीत मीटर टाळून थेट वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना कळवण्यात आले. मात्र विहित मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.