तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:31 PM2021-07-13T17:31:10+5:302021-07-13T17:36:38+5:30

कल्याणातील प्रसिद्ध उद्योगजकांवर ३४ हजार रक्कमेच्या विजचोरीचा आरोप, एमएससीबीने केली पोलीस ठाण्यात तक्रार 

electricity theft case registered against kalyan businessman sanjay gaikwad | तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल

तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल

Next

कल्याण: एकीकडे कोरोना काळात सामान्य नागरिक महावितरणाने दिलेली बिलं मोठ्या मुश्किलीने भरत असताना कल्याणमध्ये एक वेगळा प्रकार समोर आल्यान लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याणमधील प्रसिद्ध उद्योगपती तथा गौरी विनायक डेव्हलपर्सचे मालक संजय गायकवाड यांच्यावर ३४ हजार रुपयांच्या विजचोरीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्याकडे ८ कोटींची रॉल्स रॉईस कार आहे. या कारमुळे ते चर्चेतही आले होते. त्यामुळे ८ कोटींची कार घेणाऱ्या उद्योगपतीला ३४ हजारांचं बिल भरता येत नाही का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

महावितरणाने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला. मात्र वीजचोरीचा आरोप गायकवाड यांनी फेटाळला आहे. हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याच त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान नंतर  संबंधित रक्कम गायकवाड  यांनी भरली असल्याचे सांगत हा गुन्हा मागे घेण्याची विनंती महावितरणाने केली आहे. गायकवाड एका राजकीय पक्षाच्या जवळचे मानले जातात.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. मार्च-२०२१ मध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रितसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व १५ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय अनंत गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता बुंधे यांच्या वतीने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार ३० जून रोजी गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व तडजोडीची १५ हजार रुपयांची रक्कम सोमवारी १२ जुलै रोजी महावितरणकडे भरल्याचं  महावितरणकडून सांगण्यात आलय. 

संजय गायकवाड यांनी मात्र वीजचोरीचा आरोप फेटाळून लावलाय. वीजचोरी करत असतो, तर महावितरणाने वीज खंडित का केली नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ही वीज चोरी नसून तडजोडीचे बिल आहे. मीटरचा एक फेज जळाला होता. त्यामुळे दुसरा फेज बायपास असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तडजोडी अंती ३४ हजार भरायला सांगितले होते ते भरण्यात ही आले आहेत. तरीसुद्धा या तांत्रिक मुद्द्याला चोरीचा रंग देणे हे आपल्यावर अन्याय करणारे असून या प्रकारात आपली प्रतीमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असल्याचा दावाही  गायकवाड यांनी केला. 

Web Title: electricity theft case registered against kalyan businessman sanjay gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज