कल्याण पूर्वेत १३ बंगले मालकांची वीजचोरी पकडली, ७८ लाख ४९ हजारांची वीजचोरी उघडकीस
By अनिकेत घमंडी | Published: November 7, 2022 04:56 PM2022-11-07T16:56:26+5:302022-11-07T16:56:26+5:30
महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
कल्याण: महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत विशेषत: बंगले मालकांकडून सुरू असलेल्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून १३ बंगले धारकांची ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे.
कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर वीजचोरी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात १३ बंगले मालकांकडील ३ लाख २७ हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. यात भाल येथील एकाच बंगल्यात विनामीटर केबल टाकून सुरू असलेल्या ६ लाख ७२ हजारांच्या वीज चोरीचा समावेश आहे. तर नेवाळी येथील एका जीन्स कारखान्याची १३ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. एकट्या ऑक्टोबर महिन्यात या परिसरात ५९ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून ६८ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला. संबंधितांना वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती व त्यांच्या टिमने ही कामगिरी केली. वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये तसेच अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.