एकीशी साखरपुडा तर दुसरीसोबत लग्न; वरात निघाली पण पोलिस ठाण्यात!
By प्रशांत माने | Published: May 18, 2023 05:46 PM2023-05-18T17:46:23+5:302023-05-18T17:47:29+5:30
सहा वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्न सोहळया दरम्यान सिध्दार्थ भेटला होता. तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: एकीशी साखरपुडा केला असताना तीची फसवणूक करीत दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी नवरोबा सिध्दार्थ शिंदे (वय ३१) याला लैंगिक अत्याचार आणि फसवणूकीच्या गुन्हयाखाली अटक करताना त्याचे वडील दिलीप आणि आई शांता या दोघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सहा वर्षापूर्वी पीडित मुलीला एका लग्न सोहळया दरम्यान सिध्दार्थ भेटला होता. तिच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध देखील प्रस्थापित केले. पुढे त्याने पैशांची अडचण सांगून तिच्याकडून लाखभर रुपये देखील उकळले. दरम्यान पिडीतेला साखरपुडा करून लग्नाचे वचन दिले असतानाही गावाकडील दुसऱ्या मुलीसोबत सिध्दार्थने मुंबईत दोन दिवसांपूर्वी लग्न केले.
ही माहीती पिडीत मुलीला समजताच तीने कुटुंबासह विष्णुनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि सिद्धार्थ विरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदविला. आधी साखरपुडा झाला असल्याचे माहीती असूनही सि्ध्दार्थचे दुस-या मुलीसोबत लग्न लावणा-या त्याच्या आई वडीलांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान तक्रार दाखल होताच लग्न करून घरी परतलेल्या नवरोबा सिध्दार्थची वरात पोलिसांनी थेट पोलिस ठाण्यात काढीत त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. त्याची आई आणि वडिलांचा पोलिस शोध घेत आहेत.