शिवसेना शिंदे गटाने काल गाजावाजा करत शुभारंभ केलेले ठाकुर्लीचे एस्कलेटर आज बंद
By अनिकेत घमंडी | Published: August 25, 2023 08:27 AM2023-08-25T08:27:08+5:302023-08-25T08:28:39+5:30
प्रवाशाची ट्विट करून तक्रार
अनिकेत घमंडी, डोंबिवली: शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी गुरूवारी मोठा गाजावाजा करत ठाकुर्ली येथील पूर्वेला असलेल्या स्वयंचलित जिन्याचा शुभारंभ केला, मात्र शुक्रवारी पहाटेपासून ते जिने बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
कौस्तुभ देशपांडे या प्रवाशाने त्यासंदर्भात ट्विट करून रेल्वेला तक्रार देऊन नाराजी व्यक्त केली. शुभारंभ करताना सगळी काळजी घेऊन चाचण्या करून ती सेवा सुरू केली जाते तर मग अचानक बंद का ठेवली? तसेच जर सकाळी ७ नंतर सुरू करण्याचे ठरवले असेल तर तसे कोणी ठरवले आणि का? असा सवालही त्यांनी केला. ज्या राजकारणी नेत्यांनी येथे येऊन ते सुरू केले त्या नेत्यांनी आता बंद का ठेवले याची कारणमीमांसा स्पष्ट करून रेल्वेला जाब विचारणा करावी असेही देशपांडे यांचे म्हणणे आहे.
सुविधा सुरू करायची आणि बंदही करायची हे काही बरोबर नाही, सेवा देताना ती अव्याहत सुरू ठेवणे हे रेल्वेचे कर्तव्य आहे. टेक्नोसॅव्ही होताना ती अखंड द्यावी. तसेच मध्यरात्री शेवटची लोकल।गेल्यावर हवं तर बंद करून पहाटे निदान पाच वाजता ती सेवा सुरू असायला हवी, पण तसे झाले नाही.
त्यामुळे झटपट प्रवासाची हमी देणाऱ्या रेल्वेने ती सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली, त्याचे नियोजन फसले अशी टीका त्यांनी केली.
डोंबिवली पूर्वेला जी यंत्रणा आहे ती देखील नेहमी बंद असते, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. रेल्वे यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने त्या स्वयंचलीत जिने संदर्भात कार्यवाही करून सेवा तात्काळ सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी देशपांडे यांनी केली.
देशपांडे यांनी काल सुरू आज बंद मध्य रेल्वे एक कदम पिछे अशा आशयाचे ट्विट करून नाराजी व्यक्त केली. दोन्ही फोटो टाकून त्यांनी वस्तुस्थिती दाखवून वास्तवता दर्शवली.
दुसरे एक प्रवासी मंदार अभ्यंकर यांनीही नाराजी दर्शवली त्यांनी तर नव्याचे नऊ।दिवस या उक्तीनुसार तरी सेवा द्या अशी टीका केली आणि ट्विट।केले.