आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले, सर्वत्र हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 08:25 AM2023-07-20T08:25:55+5:302023-07-20T08:26:39+5:30
कल्याण रेल्वेस्थानकाजवळची दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याने ठाकुर्ली ते कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान हजारो प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून वाटचाल करीत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रीपुलाजवळील नाल्यावरील रुळातून जात असताना भिवंडीत राहणाऱ्या योगिता शंकर रुमाल (वय २५) या मातेची चार महिन्यांची मुलगी तिच्या आजोबांच्या हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे तासभर उभी होती. त्यामुळे अनेक प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात असताना ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. चार महिन्यांचे हे बाळ घेऊन तिचे आजोबा चालत होते व सोबत बाळाची आई होती. अचानक आजोबांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटले आणि ते नाल्यात पाण्याच्या प्रवाहात पडले. प्रवाहाच्या जोरात ते बाळ वाहून गेले. या आघातामुळे बाळाची आई जिवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी आक्रोश करीत होती. ते पाहून साऱ्यांचेच डोळे भरून आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवली, पण बाळ सापडले नाही.