कोमसापची कल्याण ग्रामीण शाखा स्थापन, अध्यक्ष पदी रवींद्र घोडविंदे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:29 PM2023-04-22T21:29:58+5:302023-04-22T21:30:11+5:30
यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली.
कल्याण - कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यात आली. अध्यक्ष पदी रविंद्र घाेडविंदे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली.
मराठी साहित्य आणि भाषेच्या संवर्धनासाठी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी १९९१ मध्ये सुरू केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. कोकणात जवळपास ६४ शाखा कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण भागात साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे , इथल्या बोली भाषांचे जतन व्हावे , तसेच वाचन , लेखन परंपरा समृद्ध व्हाव्यात म्हणून ६५ व्या कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी कोमसापचे केंद्रिय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा कांदळकर , युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर आदी उपस्थित हाेते. या शाखेच्या अध्यक्ष पदाची धुरा घोडविंदे यांच्याकडे सोपविण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी प्रा. अनिल सुरोशी , कोषाध्यक्ष पदी प्रा. प्रकाश रोहणे असे १४ जणाचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. या शाखेत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यरत झाली असून शाखेमार्फत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार सर्वांनी आजच्या स्थापना सभेत केला आहे. या प्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी या वर्षाचे युवा साहित्य संमेलन जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे घेण्याचे जाहीर केले आहे.