अतिवृष्टीचा धोका ओळखून 2 अतिधोकादायक इमारतीतील २८ जणांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:57 PM2021-06-09T20:57:51+5:302021-06-09T20:58:20+5:30
सीसीटीव्ही द्वारे पूर सदृश्य परिस्थितीवर केडीएमसीची नजर
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत काल रात्रीपासून एकूम ८३.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी काही इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील २ अतिधोकादायक इमारतीतील २८ नागरीक स्थलांतरीत करण्यात आले आहेत. भविष्यातील दुर्घटनांचा अंदाज ओळखून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवास मुक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या आहेत. ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु आहे. अ प्रभागात टिटवाळा परिसरातील १ अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे महापालिकेतील सखल भागात पाणी साचल्याने काही नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याचे महापालिका प्रशासनाने मान्य केले आहे. महापालिकेने मनुष्यबळासह जेसीबीचा वापर करीत पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंत्या सपन कोळी देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाणी कुठे साचले आहे याचे अवलोकन करुन पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकारी वर्गास दिले.