पाच दिवसांनंतरही ‘त्या’ आईचा थांगपत्ता लागेना, आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:01 AM2020-12-12T01:01:21+5:302020-12-12T01:01:48+5:30
ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात सोमवारी दोन लहान मुले सोडून जाणारी आई रत्नमाला साहू हिचा पाच दिवस उलटूनही शोध लागलेला नाही.
डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीच्या परिसरात सोमवारी दोन लहान मुले सोडून जाणारी आई रत्नमाला साहू हिचा पाच दिवस उलटूनही शोध लागलेला नाही. खाडीच्या पाण्यात उडी मारून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांकडून आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही आधार घेतला जात आहे.
साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फूट रोड परिसरात वास्तव्याला आहे. खाडी परिसरात बेवारस स्थितीत आढळलेली दोन्ही लहान मुले सध्या ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात आहेत. तर रत्नमाला हिचा पती सुब्रत तिचा सर्वत्र शोध घेत आहे. खाडीकिनारी तिची चप्पल आणि मोबाइल आढळून आला आहे, पण पाच दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
विष्णूनगर पोलिसांप्रमाणे टिळकनगर पोलीसही तिचा शोध घेत आहेत.
साहू कुटुंब राहत असलेल्या परिसरातील तसेच कचोरे खाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जाणार आहेत. यात काही तपासाचा धागादोरा सापडतो का, हे पाहिले जाणार आहे. यासंदर्भात या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस नाईक युवराज बागुल यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.