डोंबिवलीत चाललयं तरी काय! भिंतीला भगदाड पाडत ७५ लाखांचे दागिने लंपास
By प्रशांत माने | Published: December 1, 2023 04:53 PM2023-12-01T16:53:15+5:302023-12-01T16:54:31+5:30
शेजारील दुकान भाड्याने घेवून मारला डल्ला.
डोंबिवली: खून आणि प्राणघातक हल्यांच्या घटनांनी शहरात हिंसाचाराच्या घटना बोकाळल्या आहेत, आता अशातच दुकान भाड्याने घेवून बाजुकडील ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत सुमारे ७५ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिमेकडील महात्मा फुले रोड येथील रत्नसागर ज्वेलर्स येथे घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७० किलो चांदी आणि २० तोळे सोन्याचे दागिने या घटनेत चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध ही चोरी केल्याचे यात समोर आले आहे. रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारीच असलेला रिकामा गाळा काही तरुणांनी भाड्याने घेतला होता. हे तरुण झारखंड येथील राहणारे होते. १५ दिवसांपुर्वी त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाळयाबाहेर मोमोज कॉर्नर नावाचा बोर्ड देखील लावला होता.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानातून शेजारच्या ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून प्रवेश करत त्यांनी सोने-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. चोरटयांनी गॅस कटरने तिजोरी देखील फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते असफल ठरले. दरम्यान चोरटे पसार झाले असून विष्णूनगर पोलीसांनी या गुन्हयाच्या तपासकामी तीन पथके तयार केली आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात देखील चोरी झाली होती. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे घटना घडल्याने सोने- चांदी व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.