तिसऱ्या दिवशीही ‘त्या’ बाळाचा लागला नाही शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 08:26 AM2023-07-22T08:26:26+5:302023-07-22T08:26:44+5:30
स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाकुर्ली कल्याण मार्गावर रुळाखालील नाल्यात पडून रिषिका रुमाल या लहान बाळाचा शोध तिसऱ्या दिवशीही तपास यंत्रणेला लागला नाही. एनडीआरएफने गुरुवारीच तपास थांबवला होता. स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे.
शुक्रवारी सकाळी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली. पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे तपास कार्यात अडथळे आले. दुपारनंतर काम थांबवले असले तरीही शनिवारी पुन्हा पाहणी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिला जन्मापासून शौचाच्या ठिकाणी जागेचा विकार असल्याने तिच्यावर दहाव्या दिवसापासून मुंबईतील वाडिया इस्पितळात उपचार सुरू होते. बुधवारी त्याच उपचारासाठी या तान्हुलीला घेऊन तिचे आजोबा व आई गेले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून प्रवास सुरू केला. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली.
दुर्दैवी रिषिकाची आई योगिता ही भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील राहणारी आहे. पाच ते सहा महिन्यांची ही मुलगी असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. मात्र, तिचे बारसे केलेले नव्हते. त्यामुळे काही जण तिला दर्शिका या नावानेही हाक मारत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. बुधवारी तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते .