कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन
By मुरलीधर भवार | Published: January 16, 2024 03:50 PM2024-01-16T15:50:09+5:302024-01-16T15:50:55+5:30
प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण- स्वगीय खाशाबा जाधव यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काल केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा आटयापाटया असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने स्व.खाशाबा जाधव यांचा जन्म दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात काल संपन्न झाला, त्यावेळी बोलतांना आमदार म्हात्रे यांनी वरील उद्गार काढले.
शिव छत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, ग्रामीण भागातील मुलांनी मैदानाची मागणी केली तर ती उपलब्ध करुन दयावीत, शिव छत्रपती पुरस्कार मिळालेल्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी मिळावी ही मागणी मी अधिवेशनात केली आहे अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी यावेळी दिली.
प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, खाशाबा जाधव यांचे सुपूत्र रणजीतसिंह जाधव त्यांच्या पत्नी भारती कल्याण तालुका शारीरिक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, प्रशिक्षक पूर्वा मॅथ्यु लोकरे आणि सुप्रिया नाईकर , शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रशांत पाटील, क्रिडा पत्रकार अविनाश ओंबासे , राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, शिक्षण व क्रीडा विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव, अर्चना दिवे, वंदना गुळवे, सहा.आयुक्त स्नेहा करपे तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब, निमिष कुलकर्णी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे योग्य ते क्रीडा धोरण सर्वांचे सहकार्याने ठरविण्यात येईल. महापालिका क्षेत्रातील क्रीडांगणे विकसित करून योग्य त्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल असे प्रतिपादन शिक्षण व क्रीडा विभागाचे उपायुक्त जाधव यांनी यावेळी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाच्या जनजागृतीसाठी कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रिडांगणापासून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यत क्रिडा जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ४०० शालेय विदयार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.