कल्याण पश्चिमेतून विधानसभेसाठी माजी नगरसेवक श्रेयस समेळ इच्छूक
By मुरलीधर भवार | Published: June 22, 2024 03:51 PM2024-06-22T15:51:40+5:302024-06-22T15:52:13+5:30
माजी नगरसेवक समेळ यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे त्यांनी नगरसेवक पद भूषविले आहे. त्याचबरोबर त्यांनी महापालिकेतील सभागृह नेते पद भूषविले आहे.
कल्याण- लोकसभा निवडणूक पार पडल्यावर आत्ता विधानसभा निवडणूकीचे वेध अनेकांना लागले आहे. कल्याम पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास कल्याण डाेंबिवलीचे माजी नगरसेवक श्रेयस समेळ हे इच्छूक आहेत अशी माहिती स्वत: समेळ यांनी दिली आहे. माजी नगरसेवक समेळ हे शिंदे सेनेचे कल्याण विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी आहेत. विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर हे शिंदे सेनेचे आमदार आहेत. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी समेळ यांच्या दाव्यामुळे शिंदे सेनेतील सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
माजी नगरसेवक समेळ यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे त्यांनी नगरसेवक पद भूषविले आहे. त्याचबरोबर त्यांनी महापालिकेतील सभागृह नेते पद भूषविले आहे. ते उच्च शिक्षित आहेत. त्यांना समस्यांची चांगली जाण आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात शहराचे काही प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. त्यापैकी काही प्रश्न सुटले. काही अद्याप सुटलेले नाही. समेळ यांचे कुटुंबिय गेल्या अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. समेळ यांनी २०१९ सालीही कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यांची पक्षाने मुलाखतही घेतली हेाती. त्यावेळी सर्वानुमते सर्व इच्छूकांनी मिळून विद्यमान आमदार भोईर यांना उमेदवारी देण्यास सहमती दर्शविली होती. त्यानुसार पक्षाने भोईर याना उमेदवारी दिली. भोईर यांच्या विजयासाठी समेळ यांनी कुठलाही संकोच न ठेवता काम केले होते. आत्ता नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. तर भिवंडी लोकसभेत महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील हे पराभूत झाली.
कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघातून महायुतीला १ लाख ५ हजार मते मिळाली. तर महाविकास आघाडीला ७५ हजार मते पडली आहे. हे मताधिक्य पाहता महायुतीचे पारडे जड आहे. कल्याण पश्चिमेतून समेळ इच्छूक आहेत. ही इच्छा त्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे बोलून दाखविली आहेत. कल्याण पश्चिमेचा विकास जसा व्हायला हवा होता. तसा झालेला नाही. त्यामुळे मी निवडणूक लडविणार आहे असे समेळ यांनी सांगितले. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करणार नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.