केडीएमसी हद्दीतील ५०० चौरस फूटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा, माजी शिवसेना नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 04:57 PM2022-01-04T16:57:37+5:302022-01-04T16:57:59+5:30
KDMC : कोरोनाची परिस्थिती विचारात घेता या मागणीचा विचार सरकार नक्कीच करेल अशी अपेक्षा दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण : राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या प्रमाणेच कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पाचशे चौरस फूटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांप्रमाणेच कल्याण डोंबिवली महापालिका ही देखील मुंबई महानगर विकास प्रदेश क्षेत्रात येते. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूटाच्या घरांच्या मालमत्ता कराच्या माफीचा विचार करावा. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ५०० चौरस फूटाच्या घरांची किंमत आजमितीस बाजार भावाप्रमाणे किती आहे. त्या तुलनेत कल्याण डोंबिवलीतील ५०० चौरस फूटाच्या घरांची किंमत कमी आहे.
सर्व सामान्य चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत राहतो. तो कामाला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या परिसरात जातो. त्याच्या माफीचा विचार देखील व्हावा. म्हात्रे यांनी या मागणीकडे राज्य सरकारडे लक्ष वेधत असताना महापालिका हद्दीत जवळपास ४० टक्के घरे ही 5क्क् चौरस फूटाच्या आकाराची असू शकतात. ज्या महापालिकांना ही मालमत्ता करात माफी दिली आहे. त्या महापालिकांच्या ठरावाची माहिती घेतली असता त्यांनी १९९५ सालाच्या पूर्वी तयार झालेल्या ५०० चौरस फूटाच्या घरांचा समावेश केला आहे. ती देखील अधिकृत घरे असली पाहिजे.
अधिकृत घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडून विविध करापोटी ७१ टक्के मालमत्ता कर वसूल केला जातो. त्यात शिक्षण, वृक्ष, सांडपाणी आदी कर वसूल केले जातात. असा मिळून ७१ टक्के कर वसूल केला जातो. प्रत्यक्षा मालमत्ता करातील अन्य कर माफ न करता बेसिक कर माफ केला जावा. त्याचा फायदा महापालिका हद्दीतील चाळवजा घरात राहणाऱ्यांना होणार आहे. कोरोनाची परिस्थिती विचारात घेता या मागणीचा विचार सरकार नक्कीच करेल अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.