उल्हासनगरात हद्दपार गुंडाला तलवारीसह अटक; बहुतांश हद्दपार गुंडाचे शहरांत बस्तान?
By सदानंद नाईक | Updated: April 7, 2025 17:35 IST2025-04-07T17:35:14+5:302025-04-07T17:35:37+5:30
उल्हासनगर सी ब्लॉक रोड परिसरात राहणाऱ्या चंदन मुन्नीसिंग राजपूत या गुंडाला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल तालुक्यातून २ वर्षासाठी तडीपार केले होते.

उल्हासनगरात हद्दपार गुंडाला तलवारीसह अटक; बहुतांश हद्दपार गुंडाचे शहरांत बस्तान?
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातून हद्दपार केलेले नामचिन गुंड पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात चोरी, हाणामारी आदी सारखे गुन्हे करीत असल्याचे उघड झाले. चंदन मुन्नीसिंग राजपूत या तडीपार गुंडाला आयडीआय कंपनीच्या गेट समोरून रविवारी रात्री साडे अकरा वाजता तलवारीसह उल्हासनगर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर सी ब्लॉक रोड परिसरात राहणाऱ्या चंदन मुन्नीसिंग राजपूत या गुंडाला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल तालुक्यातून २ वर्षासाठी तडीपार केले होते. रविवारी पेट्रोलिंग दरम्यान उल्हासनगर पोलिसांनी आयडिआय या बंद कंपनीच्या गेट जवळ रात्री साडे अकरा वाजता उभा असलेल्या एका संशयित इसमाची चौकशी केली असता, तडीपार केलेला चंदन राजपूत असल्याचे उघड झाले. त्याची अंगझडती घेतली असता तलवार मिळून आली. त्याला अटक करून गुन्हा दाखल झाला. गेल्या आठवड्यात एक तडीपार गुंडाला मोटरसायकल चोरी प्रकरणी अटक करून, त्याला बोलते केले असता, त्याच्याकडे चोरीच्या तब्बल ८ मोटरसायकली मिळून आल्या आहेत.
एकूणच शहरातून तडीपार केलेल्या गुंडाचा बस्थान शहरात असून ते सर्रासपणे चोरी, हाणामारी करीत असल्याचे उघड होत आहे. पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाचा आढावा घेतल्यास, ते शहरात राजरोसपणे राहून गुन्हे करीत असेल्याचे उघड होणार असल्याचे उघड होणार आहे. हे गुंड कोणत्या नं कोणत्या राजकीय नेत्याचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे उघड होणार असल्याचे बोलले जात आहे.