वायफाय राऊटरच्या एक्सपॅन स्वीचमध्ये स्फोट, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:01 AM2023-12-19T09:01:26+5:302023-12-19T09:01:41+5:30

कल्याणमधील घटना; महिला ८० टक्के, ३ महिन्यांचा मुलगा ५० टक्के भाजला

Expan switch of WiFi router explodes, injures three | वायफाय राऊटरच्या एक्सपॅन स्वीचमध्ये स्फोट, तीन जखमी

वायफाय राऊटरच्या एक्सपॅन स्वीचमध्ये स्फोट, तीन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चाैधरी चाळीतील वायफाय  राऊटरच्या कनेक्शनला सप्लाय करणाऱ्या एक्सपॅन स्वीचचा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाप्रकरणी केबल चालकाविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घराबाहेर  शनिवारी संध्याकाळी ६ वाजता वायफायच्या राऊटरला सप्लाय करणाऱ्या एक्सपॅन स्वीचचा स्फोट झाला. यामळे लागलेल्या आगीत सायमा यांची १० वर्षांची मुलगी नाजमीनचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी या ८० टक्के भाजल्या आहेत. तर त्यांचा तीन महिन्यांचा लहान मुलगा अरमानही ५० टक्के भाजला आहे. या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

काळजी घ्या
अनेकांच्या घरात केबलचा वायफाय राऊटर आहे तसेच त्याला सप्लाय देणारे एक्सपॅन स्वीचही एका ठिकाणी बसविलेले असते तेथेही अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळजीने अनेक जण धास्तावले आहेत.

शॉर्टसर्किटमुळे स्फोट?
    कल्याणमधील केबल व्यावसायिक असलेले जगदीश खरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वायफाय राऊटर सप्लाय एक्सपॅन स्वीच याच्या क्वालिटीचा प्रश्न उद्धवत नाही. ते चांगल्या कंपनीचेच असते. मात्र, ज्या ठिकाणी घटना घडली ते पाहता शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा. 
    त्याचबरोबर काही वेळेस विजेचा पुरवठा कमी-जास्त दाबाने  होतो. अचानक विजेचा पुरवठा जास्त दाबाने सुरू झाला तर अशा  प्रकारे स्वीचचा स्फोट होऊ शकतो.

सुरक्षेची केली नाही उपाययोजना
टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गीते यांच्याकडे या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या स्फोटाच्या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी केबलचालक राजू  म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
केबल चालकाने राऊटर सप्लायचे एक्सपॅन स्वीच चाळीच्या बाहेर लावले होते. हे लावत असताना सुरक्षेची कोणतीही उपाययोजना 
केली नाही. त्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. 
वायफाय राऊटरला सप्लाय करणारे एक्सपॅन स्वीच हे कोणत्या कंपनीचे होते? ते निकृष्ट दर्जाचे होते का? त्याची देखभाल दुरुस्ती केली गेली होती की नाही? याविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही गीते यांनी स्पष्ट केले.

Web Title: Expan switch of WiFi router explodes, injures three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट