करणीची बतावणी करुन मालकाला लाखो रुपयांचा गंडा
By प्रशांत माने | Published: September 15, 2022 07:46 PM2022-09-15T19:46:03+5:302022-09-15T19:47:24+5:30
घरकाम करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या.
डोंबिवली: तुमच्यावर करणी झाली आहे. या करणीमुळे तुमच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. पूजा अर्चा करुन त्यावर केलेली करणी काढते अशी बतावणी करुन घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या वयोवृद्ध मालकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्रिषा कुणाल केळुसकर हिला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून १५ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखीन एका आरोपीचा शोध सुरू आहे.
डोंबिवली येथील खोणीगाव परिसरातील ऑरेलिया पलावा येथे राहणारे वसंत समर्थ (वय ७९) यांच्यासोबत हा फसवणूकीचा प्रकार घडला. समर्थ यांच्या पत्नीचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा कॅनडामध्ये नोकरीनिमित्त राहत आहे. समर्थ हे घरात एकटेच राहत असल्याने त्यांनी घरकाम करणोसाठी त्रिषा केळुसकर या महिलेला ठेवले होते. घरकाम करताना त्रिषा हिने समर्थ यांना तुमचे घरावर कोणीतरी करणी केली आहे ती मरीयम नावाचे मुस्लिम महिलेस ओळखत असून तिचेकडे वेगळी शक्ती आहे, ती तुमची सर्व पिडा दूर करेन असे सांगायची. तुमचे घराचे समोरील फ्लॅटवर कोणीतरी करणी केली आहे ती तुमच्यावर उलटली आहे. त्यात तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तुमचाही मृत्यू होऊ शकतो. या अदृश्य शक्तींपासून बचाव करणोसाठी काही खर्च करावा लागेल अशी बतावणी करीत त्रिषाने समर्थ यांची ओळख मरियम हिच्याशी करून दिली.
मरियम हिने दान म्हणून समर्थ यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, हार्माेनियम, सुटकेस, घडयाळ, म्युझीक सिस्टिम, कपडे आणि एक कार देखील घेतली. विशेष बाब म्हणजे संबंधित कार स्वत:च्या नावे करणोसाठी आरटीओच्या ट्रान्सफर पेपरवर समर्थ यांच्या सह्या देखील घेतल्या. दरम्यान आपली फसवणूक झाल्याची बाब समर्थ यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी फसवणूकीसह अंधश्रद्धा निर्मूलन कायदयान्वये गुन्हा दाखल केला. एका वयोवृध्द नागरीकाची झालेली फसवणूक आणि या घटनेमुळे जनमाणसात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता पाहता वरीष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानोबा सुर्यवंशी यांचे पथक त्रिषा हिच्या शोधासाठी पाठविले. तिला अटक करून तिची चौकशी करता समर्थ यांच्याकडून उकळलेल्या वस्तू आणि ऐवज, रोकड खोणी येथील तळोजा रोडवरील आर्चिड येथील घरात ठेवल्याची माहीती समोर आली. समर्थ यांची कार देखील इमारतीच्या आवारात ठेवली होती. मरियमचा शोध सुरू आहे अशी माहीती बागडे यांनी दिली.