कोरोनाच्या काळात प्रवाशांकडून जादा भाडेवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:00 AM2020-11-26T01:00:16+5:302020-11-26T01:00:41+5:30

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षाचालकांकडून लूट : मीटरऐवजी शेअर रिक्षाला प्रवाशांचे प्राधान्य

Extra fare charged from passengers during the Corona period | कोरोनाच्या काळात प्रवाशांकडून जादा भाडेवसुली

कोरोनाच्या काळात प्रवाशांकडून जादा भाडेवसुली

Next

प्रशांत माने

कल्याण : कल्याण आरटीओच्या हद्दीत ४० हजारांहून अधिक रिक्षा असून, त्यातील निम्म्या रिक्षा कल्याण-डोंबिवली शहरांत आहेत. एकीकडे ई-मीटरने भाडे घेणे सक्तीचे केले गेले असताना दुसरीकडे प्रवाशांच्या आग्रहास्तव ९० टक्के रिक्षा येथे शेअरवर चालतात. सध्या कोरोनाचे नियम पाळून अनलॉकमध्ये रिक्षा व्यवसायाला परवानगी मिळाली आहे. मात्र, रिक्षाचालक शेअरचे भाडे जादा आकारत असून, त्यांच्या या लुटीकडे आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

आरटीओकडून परवान्यांची खिरापत वाटणे सुरूच असल्याने रिक्षांची संख्या वाढतच आहे.  त्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. लॉकडाऊनमध्ये बंद असलेला व्यवसाय व रिक्षांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या स्पर्धेत सध्या शेअरमध्ये जादा भाडे आकारून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे. अनलॉकमध्ये दोन प्रवाशांना प्रवासास परवानगी आहे. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी जेथे शेअर रिक्षासाठी १० रुपये भाडे आकारले जात होते, तेथे आता २० रुपये घेतले जात आहेत.

स्थानकापासून शेअरचे प्रतिव्यक्ती भाडे
आयरेगाव     २०
जयहिंद कॉलनी      २०
कल्याण-डोंबिवली  ५०
पेंढरकर महाविद्यालय   ३०
गरीबाचावाडा     २०

आरटीओने लक्ष घालावे

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना रिक्षाचालकांकडून नियमांची होणारी ऐशीतैशी आणि जादा भाडे आकारणीकडे आरटीओने लक्ष द्यावे.    
    -  चैत्राली कदम, प्रवासी, डोंबिवली पूर्व

बसला विळखा
एकीकडे जादा भाडे आकारून लूट चालवली असताना दुसरीकडे एसटी किंवा केडीएमटी उपक्रमाच्या बसला विळखा घालून तेथील प्रवासी मिळविण्याचा प्रयत्न रिक्षाचालकांकडून होत असल्याचे चित्र डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात दिसून येते.

 कोरोनाच्या काळात कोणी नियम पाळत नसेल तसेच जादा भाडे आकारत असेल, तर त्याबाबतच्या दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या वैयक्तिक तक्रारींवर कारवाई केली जात आहे.     
     तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी, कल्याण

Web Title: Extra fare charged from passengers during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.