कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी?
By मुरलीधर भवार | Published: October 19, 2024 02:54 PM2024-10-19T14:54:02+5:302024-10-19T14:54:42+5:30
कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात जागा वाटपावरुन महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. एकीकडे या मतदार ...
कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात जागा वाटपावरुन महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. एकीकडे या मतदार संघावर उद्धव सेनेकडून दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही या मतदार संघात दंड थोपटले आहेत. ही जागा काँग्रेसला द्यावी. उद्धव सेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांना उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे, असा टोला काँग्रेस पक्षाच्या नागरी विकास सेलचे अध्यक्ष नवीन सिंग यांनी लगावला आहे.
२००९ साली शिवसेनेकडून पुंडलिक म्हात्रे यांनी निवडणूक लढविली होती. ते पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांनी निडणूक लढविली. त्यांनाही पराभव सहन करावा लागला. २०१९ मध्ये शिवसेने उमेदवारी दिली नाही. म्हात्रे आणि लांडगे यांना पराभूत करुन दोन्ही वेळा आमदार गणपत गायकवाड हे निवडून आले होते. शिवसेना भाजपची युती उमेदवारी भाजपचे आमदार गायकवाड यांना दिली गेली. त्यामुळे शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली होती. त्यांचा पराभव झाला. दोन वेळा या मतदार संघात शिवसेनाला पराभव सहन करावा लागला. आत्ता उद्दव सेना आणि शिंदे सेना या दोन शिवसेना आहेत. उद्धव सेना महाआघाडीत आहे. महाआघाडीतील उद्धव सेनेचे निष्ठावंत असलेले धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील हे इच्छूक आहे. मात्र शिंदे सेनेकडून इच्छूक असलेल्या उमेदवारी मिळाली नाही तर ते उद्धव सेनेत येऊ शकतात. त्या आधीच उद्धव सेनेकडून निष्ठावंता उमेदवारी द्यावी असा ठराव करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नागरी सेलचे अध्यक्ष सिंग यांनी उद्धव सेनेला उमेदवार आयात करण्याची वेळ असल्याची टिका केली आहे. काँग्रेस आणि उद्धव सेना या दोन्ही पक्षातील इच्छूकांकडून हा मतदार संघ आपल्याच पक्षाला मिळावा अशी आग्रही मागणी असल्याने या जागेवरुन महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण झाला आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते काय तोडगा काढतात ? ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार ? हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या २४ तास आधी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छूकांचे डोळे नेत्यांच्या निर्णयाकडे लागले आहेत.