महावितरण कर्मचाऱ्यांसाठीचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात, दीड हजार जणांचा सहभाग
By अनिकेत घमंडी | Published: February 13, 2024 04:24 PM2024-02-13T16:24:09+5:302024-02-13T16:25:26+5:30
जवळपास दीड हजार कर्मचारी व कुटुंबियांनी या स्नेहमेळाव्यात सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
डोंबिवली: अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांना रोजच्या ताण-तणावातून कांही क्षण विरंगुळा मिळावा या उद्देशातून महावितरणकडून वर्षातून दोनदा कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार कोंकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल तसेच कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी उंबर्डे येथील गावदेवी क्रीडांगणात आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. जवळपास दीड हजार कर्मचारी व कुटुंबियांनी या स्नेहमेळाव्यात सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून स्नेहमेळाव्यात व्यावसायिेक कार्यक्रमाऐवजी महावितरणचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कला-गुणांना संधी देण्यात आली. त्यांच्या या संकल्पनेला मूर्त रूप देताना कर्मचारी आणि कुटुंबियांनीही व्यावसायिक कार्यक्रमाच्या तोडीच्या सादरीकरणाने उपस्थितांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमात जवळपास १५० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी विविध मराठी-हिंदी गिते, अभिनय, नाटिका आणि कला सादर केल्या.
कल्याण परिमंडलाकडून मुख्य अभियंता औंढेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागातून ‘शोले’ सिनेमाच्या धर्तीवर सादर केलेल्या नाट्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तर कल्याण मंडल एककडून अधीक्षक अभियंता दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांची कमाई करणाऱ्या कल्याण-रत्नागिरी परिमंडल संयुक्त संघातील खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, दीपक पाटील, दिलीप भोळे, विजय मोरे, संदीप पाटील, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार यांच्यासह नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अधिकारी, अभियंते व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, शशिकांत पोफळीकर, व्यवस्थापक योगेश अमृतकर, सर्व कार्यकारी अभियंते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता कांतिलाल पाटील आणि उपव्यवस्थापक राधिका पवार यांनी केले.