‘तारा’च्या घरवापसीमुळे कुटुंबीय झाले आनंदी, पाळीव श्वान झाला होता बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:47 AM2020-12-22T00:47:27+5:302020-12-22T00:47:54+5:30
Kalyan : डोंबिवली जिमखान्यासमोर राहणारे आशिष मालतपुरे यांच्या घरी त्यांनी गोल्डन रिट्रीवर जातीची कुत्री पाळली आहे. तिचा त्यांच्या घरातील मंडळींना भलताच लळा लागला आहे.
कल्याण : पाळीव श्वान हे घरातील सदस्य होऊन जातात. कुटुंबातील व्यक्तींना त्यांचा इतका लळा लागतो की, ते कुठे गेले, तर सगळे कुटुंब अस्वस्थ होते. तारा नावाची कुत्री अशीच खेळताना घराबाहेर गेली. ती हरवल्याने तिला पाळणारे कुटुंब अस्वस्थ झाले. शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर ‘पॉज’ या प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या मदतीने ताराला शोधण्यात यश आले आहे. ताराच्या घरवापसीमुळे ‘त्या’ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेले आहे, तर ताराही खुशीत आहे.
डोंबिवली जिमखान्यासमोर राहणारे आशिष मालतपुरे यांच्या घरी त्यांनी गोल्डन रिट्रीवर जातीची कुत्री पाळली आहे. तिचा त्यांच्या घरातील मंडळींना भलताच लळा लागला आहे. वयस्क झालेली तारा सोसायटीचे गेट उघडून बाहेर गेली, ती परत आली नाही. मालतपुरे कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने त्यांनी ‘पॉज’च्या हेल्पलाइनवर फोन केला. ‘पॉज’चे प्रमुख नीलेश भणगे यांनी ताराचा फोटो व माहिती काही सोशल मीडियावर व्हायरल केली. ती पोस्ट वाचून एका ग्रुपवरून अनुश्री मोरे यांनी गोल्डन रिट्रीवर श्वान सापडल्याचे कळविले.
अनुश्री मोरे, विकी राठोड आणि रिया जायस्वाल यांना भणगे यांनी ताराचे वर्णन सांगितले. नावही सांगितले. त्यावेळी त्यांनी तिला ‘तारा’ या नावाने हाक मारताच, ताराचे डोळे चमलले. त्या रात्री त्यांनी ताराला तात्पुरता सहारा दिला. अनुश्रीही स्वत: भटक्या कुत्र्यांसाठी काम करते. भणगे यांनी अनुश्री व मालतपुरे यांच्यात समन्वय साधून ताराला तिच्या मालकाकडे सुपुर्द केले.
अनुभव आला कामी
डोंबिवलीमध्ये तीन वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या श्वानांना परत त्यांच्या मालकांना मिळवून देण्याचे काम केले होते. हा अनुभव ‘पॉज’च्या गाठीशी आहे. यावेळीही त्याच उपायांचा अवलंब केला. त्यामुळे ताराचा शोध घेणे सोपे झाले, असे भणगे यांनी सांगितले.