कल्याणमध्ये रिक्षाचे मीटर डाऊनची तारीख पे तारीख; आता गणेशोत्सवानंतरचा मुहूर्त?
By अनिकेत घमंडी | Published: August 25, 2022 07:17 PM2022-08-25T19:17:31+5:302022-08-25T19:22:10+5:30
आरटीओ अधिकारी मीटर प्रवासबद्दल फारसे इच्छूक नसल्याने रिक्षाचालकांची मनमानी सुरू असल्याची टीका प्रवासी करत आहेत.
डोंबिवली - कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा प्रवासाला मीटर डाऊन नसल्याने मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे, आरटीओ विनोद।साळवी यांनी पदभार घेताच मीटर सक्ती केली जाईल असे सूतोवाच केले होते, परंतु त्याला आता तीन महिने झाले तरीही मुहूर्त मिळत नसल्याने प्रवासी नाराज आहेत. सुरुवातीला कल्याण पश्चिम येथे रेल्वे स्टेशन परिसरातील स्टँडवर मीटरसक्ती केली जाईल असे ते म्हणाले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही, नियोजन झाले नसल्याचे दिसुन आले.
आरटीओ अधिकारी मीटर प्रवासबद्दल फारसे इच्छूक नसल्याने रिक्षाचालकांची मनमानी सुरू असल्याची टीका प्रवासी करत आहेत. यासंदर्भात साळवी यांच्याशी गुरुवारी विचारणा केली असता ते म्हणाले की गणेशोत्सवानंतर बघू, संबंधित युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे, एक लेन तरी करायची आहे असेही ते म्हणाले. पण गणेशोत्सवानंतर नेमका कधी याबाबत मात्र त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही, त्यामुळे गणेशोत्सवानंतर तरी कल्याणमधील मीटर डाऊन होणार की नाही याबाबत मात्र साशंकता आहे.
डोंबिवलीमध्येही मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीच, त्यातही कहर म्हणजे शेअर प्रवासाला पहिल्या टप्प्याला जे भाडे ठरवून दिले आहे. त्यापेक्षा जास्तीचे भाडे सर्रास आकारण्यात येत आहे, तेथेही प्रवाशांची खुलेआम लूट सुरू आहे. त्यावरही आरटीओ अधिकारी अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारून शांत आहे, आरटीओ थातूर मातूर कारवाई का करते? त्यात काही साटेलोटे आहे का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.