‘पैसा महत्त्वाचा झाल्यानेच शेतकरी कर्जबाजारी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 08:07 AM2023-12-17T08:07:14+5:302023-12-17T08:07:26+5:30
दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पैसा ही एक व्यवस्था आहे ती आवश्यक असली तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही, त्यासाठी अन्नच खावे लागते. या सर्व व्यवस्थेत माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे. मात्र, हल्लीच्या आधुनिक जगात पैसा महत्त्वाचा होत असून, वस्तूचे महत्त्व घटत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अन्न पिकविणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत अप्रत्यक्षपणे तीव्र नाराजी व्यक्त केली.
दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते. बँकेच्या ‘सुवर्णबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.
कल्याण बँकेचे अभिनंदन
जगातील दु:ख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आर्थिक जगातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या-छोट्या लोकांना पैशांची गरज असते. या लहान-लहान काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी बँकांना सुरुवात झाली आणि लहान-लहान लोकांच्या मनामध्ये परमेश्वर जागरूक असून, त्यामुळे कर्ज बुडवायचाही विचार करत नाही, तो वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण जनता बँकेचे भागवत यांनी अभिनंदन केले.