कल्याण वडवली येथील शेतकरी भूमीपूत्रांना न्याय मिळवून देणार; मंत्री कपील पाटील यांचे आश्वासन
By मुरलीधर भवार | Published: February 22, 2024 04:23 PM2024-02-22T16:23:29+5:302024-02-22T16:24:26+5:30
सरकारी मार्गाने हा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील यांनी दिले आहे.
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या वडवली गावासह आसपासच्या चार गावातील शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या जागा एका बड्या बिल्डरने लाटल्या आहेत. शेतकरी आणि भूमीपूत्रांची फसवणू केल्या प्रकरणी प्रथम बिल्डरशी चर्चा करणार अन्यथा सरकारी मार्गाने हा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील यांनी दिले आहे.
बिल्डरकडून फसवणूक झालेल्या शेतकरी भूमीपूत्रांची एक सभा वडवली येथे काल सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या सभेला केंद्रीय पंचायत राज मंत्री पाटील हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपरोक्त आश्वासन दिले. या सभेला शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय पंचयात राज मंत्री पाटील यांनी सांगितले की, एका बड्या बिल्डरने वडवलीसह आसपासच्या चार गावातील शेतकरी आणि भूमीपूत्रांच्या जागा विकासीत करण्यासाठी घेतल्या. त्याचे करारनामे इंग्रजीत असल्याने त्यात काय मजकूर लिहिला आहे. याचा काही एक तपशील जमीन देणाऱ्यांना समजून आला नाही. त्यांच्या अज्ञानाचा फायदा बिल्डरने घेतला.
करारनाम्यात जागा मालकांना किती मुदतीत मोबदला दिला जावा याचा उल्लेख होता की नाही. महापालिकेडून बिल्डरने टीडीआर घेतला. शेतकऱ्यांची काही जागा दुसऱ्यांना विकली. काही जागा विकसीत केली. या प्रकरणी संबंधित बिल्डरला अटक झाली. हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनल कडे गेले. या लवादाने जागा मालकांची फसवणूक आणि या प्रकल्पात घरे घेणाऱ्या नागरीकांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रथम संबंधित बिल्डरशी चर्चा करणार. त्याने मोबदला देण्यास नकार दिल्यास या प्रकरणाचा सोक्षमोक्ष सरकारी पातळीवर लावणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.