मुलाच्या हत्येप्रकरणी बापाला जन्मठेप, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:44 PM2021-12-10T22:44:06+5:302021-12-10T22:44:27+5:30
Kalyan District Sessions Court : संदीपन श्रीरंग हजारे (वय 50 )असे आरोपी बापाचे नाव असून किरकोळ वादातून त्याने मुलगा मुकेश (वय 29) याची धारदार चाकूने वार करून हत्या केली होती.
कल्याण: मुलाच्या हत्येप्रकरणी बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच हजार रूपयांचा दंडही न्यायालयाने सुनावला असून दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा दिली आहे.
संदीपन श्रीरंग हजारे (वय 50 )असे आरोपी बापाचे नाव असून किरकोळ वादातून त्याने मुलगा मुकेश (वय 29) याची धारदार चाकूने वार करून हत्या केली होती. 2015 ला घडलेल्या या हत्येप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रात्रीच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दुस-या दिवशी पहाटे सर्वजण झोपी गेलेले असताना मुकेशच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला होता.
हा खटला सत्र न्यायालयातील कल्याण जिल्हा न्यायाधीश ए.ए.ए. शेख यांच्या न्यायालयात चालला. सरकारी वकील म्हणून योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले. भककम पुराव्याच्या आधारे न्यायाधीश शेख यांनी आरोपी संदीपनला हत्येप्रकरणी जन्मठेप आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाणो, पोलिस निरिक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पिंगट, शशिकांत गांगुर्डे यांनी कामकाज पाहिले.