रस्त्यावरील खड्डे बुजवा, शिवसेनेच्या नगरसेवकांचं केडीएमसी आयुक्तांना साकडे
By मुरलीधर भवार | Published: August 22, 2022 04:53 PM2022-08-22T16:53:41+5:302022-08-22T16:53:55+5:30
केडीएमसीत पार पडली बैठक, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने १५ कोटी १५ लाख रुपयांची निधीची तरतूद केली होती.
मुरलीधर भवार
कल्याण-गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि स्वच्छता ठेवण्यासाठी काम करा अशी सूचना केडीएमसीतील ३० माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना केली आहे. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. दरुगधी पसरल्याने नागरीक त्रस्त आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने १५ कोटी १५ लाख रुपयांची निधीची तरतूद केली होती. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरात खड्डय़ांचे साम्राज्य पसरले. ताथूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविले गेले. खड्डय़ांमुळे नागरीकांना नाहक त्रस सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे भरले जातील. तेही काम ज्या पद्दतीने व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने झालेले नाही. इतकेच नाही तर ठिकठिकणी शहरात स्वच्छतेचा अभाव दिसत आहे. गणेश उत्सव आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. आत्ता तरी शहर खड्डेमुक्त करा आणि शहराची स्वच्छता राखा या मागणीसाठी केडीएमसीतील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी केडीएमसी आयुक्त दांगडे यांच्यासोबत आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेतली. यामध्ये विश्वनाथ राणे, दिपेश म्हात्रे, महेश गायकवाड, प्रशांत काळे, नवीन गवळी, मयूर पाटील, मोहन उगले , जयवंत भोईर, राजेश मोरे, गणेश जाधव, श्रेयस समेळ, प्रभूनाथ भोईर आदी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. रस्त्यावरील खड्डे बुजवा या मागणीसह शहरात ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. हा कचरा नियमित उचलला जावा. गणेशोत्सवा काळात शहरात स्वच्छता ठेवून सणाचे पावित्र्य राखावे अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली.
यासंदर्भात आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आले होते. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले पाहिजे. मी त्यांना आश्वास्त केले आहे. खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जातील. या काळात वाहतूक सुरळीत होईल असे सांगितले.