सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:29 PM2021-01-19T16:29:57+5:302021-01-19T16:30:31+5:30
Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु आहे. त्याकरिता टाकण्यात येणारा भरावामुळे वालधूनी नदीचे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्दा वालधूनी जलबिरादरी यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्कचे काम सुरु केले आहे. जवळपास १०० कोटी रुपये खर्च करुन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. २०१९ सालच्या अतिवृष्टीचा फटका प्रकल्पाच्या कामास बसला होता. आता कोरोना काळात प्रकल्पाचे काम मंद गतीने सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कामाला गती मिळाली आहे. याठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. शेजारीच वालधूनी नदीचे पात्र आहे.
प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जात आहे. सिटी पार्क प्रकल्पानजीकच गौरीपाडा, योगीधाम, घोलपनगर परिसर आहे. नदी पत्रात भराव टाकून प्रकल्पासाठी संरक्षक भिंत बांधल्यास पावसाळ्य़ात पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग राहणार नाही. सगळे पाणी नागरीकांच्या घरात शिरु शकते, असा मुद्दा बिरादरीच्यावतीने उपस्थित केला आहे.
या प्रकरणी बिरादरीच्या सदस्या पुष्पा रत्नपारखी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर हा विषय बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मिडियावर उपस्थित केला आहे. अतिरिक्त मातीचा भराव टाकून नदी वाचविली पाहिजे अशी मागणी रत्नपारखी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, याविषयी महापालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टीटय़ूटकडे प्रकल्पाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या होकारानंतरच सिटी पार्कचे काम नियमानुसार केले जात आहे. त्यामुळे भराव टाकणे व संरक्षक भिंतीचे काम योग्य प्रकारे सुरु आहे. त्यामुळे पाणी साचण्याचा धोका संभवत नाही.