अखेर! उल्हासनगर महापालिकेला जाग, प्लास्टिक पिशव्यावर धडक कारवाई!
By सदानंद नाईक | Published: August 23, 2023 03:39 PM2023-08-23T15:39:47+5:302023-08-23T15:40:09+5:30
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम सुरू केले, तेंव्हा नाले प्लास्टिक पिशव्यानी तुडुंब भरली होती.
उल्हासनगर : जिल्ह्यात सर्वाधिक प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने व मुख्य दुकान विक्रेते असलेली ओळख शहराला आहे. मात्र महापालिकेने मंगळवार पासून प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली असून मोठ्या माशाला अभय तर दुकानदार, हातगाडी चालकावर प्लास्टिक पिशव्या ठेवल्या प्रकरणी कारवाई केल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम सुरू केले, तेंव्हा नाले प्लास्टिक पिशव्यानी तुडुंब भरली होती. तसेच डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्याचे प्रमाण मोठें आहे. असे वक्तव्य महापालिका अधिकारी करीत असूनही प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कंपन्या व मुख्य विक्रते दुकांदारावर कारवाई झाली नोव्हती. मंगळवारी महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवडे व उपायुक्त सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, विशाखा सावंत व अन्य विभाग प्रमुख व प्रभाग अधिकाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्याच्या विक्री करणाऱ्या दुकानदारासह किरकोळ व्यापारी व हातगाडीचालकवर कारवाई केली. प्लास्टिक पिशव्या जप्त करून लाखोंचा दंडही वसूल केला आहे.
महापालिकेच्या विशेष पथकांनी शहरातील किरकोळ विक्रेते व ठोक विक्रेते यांच्याकडे असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची जप्तीची धडक कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. अशा प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे विक्रेतेने व्यापारी यांची माहिती नागरिकांनी संबंधित पथकांना तात्काळ दिल्यास, कारवाई करण्यात येणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले. मात्र आज पर्यंत महापालिका पथकांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यावर धडक कारवाई का केली नाही. अशी टीका नागरिकांकडून होत आहे. या धडक कारवाईनंतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे प्लास्टिक पिशव्याची विक्री सर्रासपणे होणार असल्याचेही बोलले जात आहे.