नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला केला दंड; चालकाने घातला पोलिसाशी वाद
By मुरलीधर भवार | Published: March 6, 2024 03:24 PM2024-03-06T15:24:12+5:302024-03-06T15:24:30+5:30
वाहतूक पोलीस रिक्षा चालकामध्ये भररस्त्यात वाद
कल्याण-शहरातील पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका रिक्षाला वाहतूक पोलिसांनी दंड आकाराला. काही क्षणात रिक्षा चालकाने वाहतुक पोलिसाला गाठले त्यानंतर वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकामध्ये जोरदार वाद झाला. रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिस आपसात भिडले. भर रस्त्यात हा गोंधळ सुरू झाला या ठिकाणी नागरीकांची एकच गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर सतत कारवाई केली जाते. या कारवाईमुळे अनेकदा नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाले आहेत. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रिक्षा चालकाची रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी होती .वाहतूक पोलिसांनी या रिक्षाला दंड आकारला. वाहतूक पोलिसांची गाडी पुढे जाताच या रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांच्या गाडी आडवली. रिक्षा चालक रवी बिलाडन याने वाहतूक पोलीस रोहिदास गावित यांच्या सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये भर रस्त्यात वाद सुरु झाला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली.
वाहतूक पोलीस रोहिदास गावित यांनी मी दंड आकारल्याने रिक्षा चालक माझ्याशी हुज्जत घालत असल्याचे सांगितले. तर रिक्षाचालकावर सातत्याने अशी प्रकारे कारवाई करत वाहतूक पोलीस रिक्षाचालकास वेठीस धरत असल्याचा आरोप केला . रस्त्यात वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेला या गोंधळामुळे या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.