उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडला आग, परिसरात धुराचे साम्राज्य, नागरिक हैराण
By सदानंद नाईक | Published: May 7, 2024 06:34 PM2024-05-07T18:34:00+5:302024-05-07T18:35:19+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याने, डम्पिंगच्या २ किमी कपरिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.
उल्हासनगर : शहरातील खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागून परिसरात २ किलो परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. धुराने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अग्निशमन विभागाचे पथक आग विझविण्यासाठी डम्पिंगवर पाण्याची फवारणी करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याने, डम्पिंगच्या २ किमी कपरिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुराने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या धुराच्या त्रासाने अनेकांनी डम्पिंग परिसरातून स्थलांतर केले. डम्पिंग ग्राऊंडवरील आग विझविण्यासाठी महापालिका अग्निशमन दलाचे पथक टँकरने पाण्याची फवारणी डम्पिंगवर करीत आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.
मात्र आग भडकून धूर पसरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. डम्पिंग हटविण्याची मागणीही जोर पकडू लागली असून डम्पिंग हटावसाठी उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन यापूर्वी स्थानिक नागरिकांनी केली आहे.